Tuesday, August 17, 2010

कामगार आहे मि तळपती तलवार आहे, सारस्वतांनो माफ करा थोडासा गुन्हा करणार आहे..

आज कवितेचा महासूर्य मावळला, कविवर्य नारायण सुर्वे यांच्या वरील हा लेख सामना दैनिकात आलाय...
1926-27 च्या काळात चिंचपोकळी येथील एका कापड गिरणीसमोर बेवारस अवस्थेत फेकून दिलेला एक अनाथ जीव गंगाराम सुर्वे या गिरणी कामगाराने उचलून घरात आणला. त्या अनाथ बालकाला स्वत:चे नाव दिले नारायण गंगाराम सुर्वे. या कोवळ्या जीवावर गंगाराम यांची पत्नी काशीबाई यांनी मुलासारखे प्रेम दिले. परळच्या बोगद्याच्या चाळीत वाढलेल्या नारायण सुर्वे यांचे आयुष्य कमालीचे दारिद्य्र, अपरंपार काबाडकष्ट आणि जगण्यासाठी केलेला संघर्ष यातून अक्षरश: तावूनसुलाखून निघाले.
दादरच्या अप्पर माहीम मराठी महापालिका शाळेत शिकणारे नारायण सुर्वे 1936 मध्ये चौथी पास झाले. त्याच वेळी गिरणीतून निवृत्त झालेले गंगाराम सुर्वे कायमचे कोकणात निघून गेले. जाताना त्यांनी हातावर टेकवलेले दहा रुपये हाच छोट्या नारायणचा एकमेव आधार. मग भाकरीचा चंद्र शोधण्यासाठी नारायण सुर्वे यांचा संघर्ष सुरू झाला. एका सिंधी कुटुंबात घरगडी, हॉटेलात कपबशी विसळणारा पोर्‍या, कुणाचे कुत्रे, तर कुणाची मुले सांभाळणारा हरकाम्या, दूध टाकणारा पोरगा अशी कामे करीतच ते वाढले. गोदरेजच्या कारखान्यात त्यांनी पत्रे उचलले. टाटा ऑईलमध्ये हमाली केली. काही काळ गिरणीतही काम केले.
कम्युनिस्ट चळवळीचा रेडगार्ड
सुर्वे वाढले त्या चाळीतील सारेचजण साम्यवादी पक्षात होते. त्यावेळी डावी चळवळ जोरात होती. ही चळवळ सुर्वेंचा मोठा आधार बनली. कम्युनिस्ट चळवळीचे ते रेडगार्ड बनले. या चळवळीतील कॉम्रेड तळेकर यांच्या भाचीवर त्यांचे प्रेम जडले आणि आईबापाविना वाढलेल्या कृष्णा साळुंके यांच्याशी त्यांचे 1948 साली लग्न झाले. खारजवळ झोपडपट्टीत त्यांनी संसार थाटला. हे झोपडे तुटले तेव्हा त्यांनी संसाराची चूल फुटपाथवर मांडली.
शिपाई झाला सुर्वे मास्तर
मुंबई महापालिकेच्या ज्या शाळेत सुर्वे यांनी सातवीपर्यंत शिक्षण घेतले त्याच शाळेत सुर्वेंना शिपाई म्हणून नोकरी लागली. नोकरी करताकरताच ते शिकले आणि 1969 मध्ये त्यांनी प्राथमिक शिक्षकाची सनद मिळविली. नायगावच्या महापालिका नं. 1 शाळेत ते शिकवू लागले तेव्हापासून ते गिरणगावचे सुर्वे मास्तर झाले. जिंदगीची धग सोसत मराठीच्या काव्यप्रांतात त्यांनी क्रांतीचा नवा सूर घुमवला. 1958 मध्ये ‘डोंगरी शेत माझं गं...’ हे त्यांचे गीत ‘नवयुग’ मासिकात प्रसिद्ध झाले. एचएमव्हीने त्याची ध्वनिफीत काढली आणि कवितेतील ‘सुर्वे युग’ सुरू झाले. कवी नारायण सुर्वे खेड्यापाड्यात पोहोचले.

कामगार आहे मी, तळपती तलवार आहे...
रोजीचा रोटीचा सवाल रोजचाच आहे
कधी फाटका बाहेर कधी फाटका आत आहे
कामगार आहे मी तळपती तलवार आहे
सारस्वतांनो! थोडासा गुन्हा करणार आहे.

थोडे राहिलेले, पाहिलेले, जोखिलेले आहे
माझ्या जगाची एक गंधवेणाहि त्यात आहे
केव्हा चुकलो, मुकलो, नवे शिकलोही आहे
जसा जगत आहे मी तसाच शब्दांत आहे.

रोटी प्यारी खरी आणखी काही हवे आहे
याचसाठी माझे जग राजमुद्रा घडवीत आहे
इथूनच शब्दांच्या हाती फुले ठेवीत आहे
इथूनच शब्दांच्या हाती खड्गे मी देत आहे.

एकटाच आलो नाही युगाचीही साथ आहे
सावध असा तुफानाची हीच सुरुवात आहे
कामगार आहे मी तळपती तलवार आहे.
सारस्वतांनो! थोडासा गुन्हा घडणार आहे।

कवी नारायण सुर्वे यांच्या काही आणखी सुदंर कविता वाचा वरील "शब्दांची सरिता" मधे.

No comments: