1926-27 च्या काळात चिंचपोकळी येथील एका कापड गिरणीसमोर बेवारस अवस्थेत फेकून दिलेला एक अनाथ जीव गंगाराम सुर्वे या गिरणी कामगाराने उचलून घरात आणला. त्या अनाथ बालकाला स्वत:चे नाव दिले नारायण गंगाराम सुर्वे. या कोवळ्या जीवावर गंगाराम यांची पत्नी काशीबाई यांनी मुलासारखे प्रेम दिले. परळच्या बोगद्याच्या चाळीत वाढलेल्या नारायण सुर्वे यांचे आयुष्य कमालीचे दारिद्य्र, अपरंपार काबाडकष्ट आणि जगण्यासाठी केलेला संघर्ष यातून अक्षरश: तावूनसुलाखून निघाले.
दादरच्या अप्पर माहीम मराठी महापालिका शाळेत शिकणारे नारायण सुर्वे 1936 मध्ये चौथी पास झाले. त्याच वेळी गिरणीतून निवृत्त झालेले गंगाराम सुर्वे कायमचे कोकणात निघून गेले. जाताना त्यांनी हातावर टेकवलेले दहा रुपये हाच छोट्या नारायणचा एकमेव आधार. मग भाकरीचा चंद्र शोधण्यासाठी नारायण सुर्वे यांचा संघर्ष सुरू झाला. एका सिंधी कुटुंबात घरगडी, हॉटेलात कपबशी विसळणारा पोर्या, कुणाचे कुत्रे, तर कुणाची मुले सांभाळणारा हरकाम्या, दूध टाकणारा पोरगा अशी कामे करीतच ते वाढले. गोदरेजच्या कारखान्यात त्यांनी पत्रे उचलले. टाटा ऑईलमध्ये हमाली केली. काही काळ गिरणीतही काम केले.